Friday, January 12, 2018

राष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील......समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर

वनामकृविच्‍या परभणी कृषि महावि़द्यालयात रासेयोच्या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी
राष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी देशात चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील, यासाठी युवक व बालकांवरील संस्‍कार महत्‍वाचे असुन आईच हे संस्‍कार देऊ शकते. जिजाऊ मातेच्‍या संस्‍कारातुन छत्रपती शिवाजी घडले. व्‍यक्‍तीचे जीवन सुंदर करण्‍यासाठी व्‍यक्‍ती चारित्र्य संपन्‍न, र्निव्‍यसनी व प्रामाणिक पाहिजे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्‍ट्रीय युवक दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 12 जानेवारी रोजी एकविसाव्‍या शतकात युवकांची भुमिका याविषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे हे प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद इस्‍माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर पुढे म्‍हणाले की, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीताच्‍या माध्‍यमातुन समाजातील अनेक समस्‍यावर उपाय असुन प्रत्‍येक तरूणांनी ग्रामगीतेचे वाचन करावे. देशाचा विकास करावयाचा असेल तर प्रत्‍येक गांव व प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा विकास करावा लागेल. शेतक-यांच्‍या श्रमास प्रतिष्‍ठा प्राप्‍त झाली पाहिजे. चारित्रसंपन्‍न राष्‍ट्रासाठी स्‍वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्‍या विचाराचे समाजात आचरण व्‍हावे लागेल. परंपरा सोडु नका पण परिवर्तनाला विसरू नका. जगातील सर्व धर्मात माणुसकीचीच शिकवण दिली जाते.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारत जगातील सर्वात तरूण देश असुन या युवाशक्‍तीच्‍या जोरावर भारत जागतिक महासत्‍ता होऊ शकतो.
डॉ पी आर शिवपुजे मार्गदर्शना म्‍हणाले की, स्‍वामी विवेकानंद सारख्‍या व्‍यक्‍तींचे आदर्श युवकांनी डोळयासमोर ठेऊन आचरण करावे. ध्‍येय निश्चिती करून शिस्‍त व कठोर परिश्रम केल्‍यास यश मिळतेच. 
याप्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक सोनाली उबाळे, शुभदा खरे, पंकज घोडके आदींनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव यांनी केले. सुत्रसंचालन यांनी डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. 

Wednesday, January 3, 2018

बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे.....महिला उद्योजिका श्रीमती कमलताई परदेशी


वनामकृवित क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्‍त आयोजित महिला शेतकरी मेळावा संपन्‍न
वनामकृवितील महिला शेतकरी मेळाव्‍यात आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना मान्‍यवर
वनामकृवित आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर
परभणी :
कोणताही व्‍यवसाय करतांना चिकाटी पाहिजे, ती चिकाटी महिलांमध्‍ये आहे. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे, त्‍यातुन स्‍वत: व कूटुंबाचा आर्थिक विकास साधावा. राज्‍यात अनेक महिला बचत गट स्‍थापन झाली, चांगला दृष्‍टीकोन ठेऊन कार्य करणारी बचत गटे यशस्‍वीपणे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन भांडगाव (ता. दौंड जि. पुणे) येथील अंबिका महिला औद्यागिक सहकारी संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती कमलताई परदेशी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामाजिक विज्ञान महाविद्यालय तसेच ठ शेतकरी महीला  कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्‍यास परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर हया प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होत्‍या तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुल‍सचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती कमलताई परदेशी यांनी यशस्‍वी महिला उद्योजिका होतांनाचा अनुभव कथन करतांना म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागातील परिस्थिती बदलयाची असेल तर महिला बचत गटांनी शेतमाला प्रक्रिया उद्योगात उतरावे. मी ग्रामीण भागातील निरिक्षण शेतमजुर महिला होते, परंतु 2000 साली महिला बचत गट स्‍थापन करून आज 200 कुटूंब आम्‍ही काम करून मसाल्‍याची पदार्थ तयार करत आहोत. यशस्‍वीपणे बाजारात अंबिका मसाल्‍याची मोठया प्रमाणात विक्री करित असुन आज देशातील विविध राज्‍यात व परदेशात आम्‍हाच्‍या मालास ही मोठी मागणी होत आहे, याचे मुख्‍य कारण म्‍हणाजे मालाची गुणवत्‍ता व दर्जा. यासाठी बचत गटातील महिलांची एकजुट महत्‍वाची आहे. बचत गटातील सदस्‍यांनी सामाजिक बांधिकी म्‍हणुन सामाजिक कार्यातही भाग घ्‍यावा. विशेषत: गाव स्‍वच्‍छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रमात योगदान घ्‍यावे, गरजुंना मदत करावी, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, आजही ग्रामीण भागात पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, ती बदलण्‍याची गरज आहे. देशात व राज्‍यात स्‍वच्‍छतेसाठी मोठे अभियान राबविण्‍यात येत आहे, परंतु प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वत:ची जबाबदारी ओळखुन योगदान दिल्‍या शिवाय यश प्राप्‍त होणे शक्‍य नाही. अनेक महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वीरित्‍या वाटचाल करित असुन श्रीमती कमलताई त्‍यातील एक आहेत. शेतमजुर ते लघुउद्योजिका कमलताईनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या जोरावर आज मोठे यश प्राप्‍त केले आहे.  
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शुन्‍यातुन विश्‍व निर्माण करणा-यां महिलाकडुन इतर महिलांनी प्रेरणा घ्‍यावी. महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यासाठी विद्यापीठ सदैव तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शेतीभाती महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपुस्तिका आदी प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात डॉ जयश्री झेंड यांनी शेती कामातील धोके व आरोग्‍य यावर तर डॉ आशा आर्या यांनी शेती निगडीत पूरक व्‍यवसाय व प्रा. विशाला पटनम यांनी ग्रामीण बालकांचे विकासांक वृध्‍दीगत करण्‍यात कुटुंबाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी महिला, शेतकरी बांधव, महिला कृषि उद्योजक, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना मा श्रीमती कमलताई परदेशी
मार्गदर्शन करतांना परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर
अध्‍यक्षीय भाषण करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले