Wednesday, November 15, 2017

बाजारभावाची अद्यावत माहिती व हवामान अंदाजातील अचुकता यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे ..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

शेती क्षेत्रामध्‍ये माहीती तंत्रज्ञानाचा वापरावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी व महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री आणि अॅग्रीकल्‍चर व ठाकुर इंस्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्‍टडीज, करिअर डेव्‍हलपमेंट व रिसर्च यांचे संयुक्‍त विदयमाने कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्रात दिनांक 14 नोव्‍हेबर रोजी शेती क्षेत्रामध्‍ये माहीती तंत्रज्ञानाचा वापर यावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री आणि अॅग्रीकल्‍चर चे उपाध्‍यक्ष श्री. समीर दुधगांवकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य डॉ. ए. एस. कडाळे, डॉ. यु. एन. आळसे, ठाकुर इंस्टिटयुट, मुंबई च्‍या डॉ. वनिता गायकवाड, प्रगतशील शेतकरी श्री. सोपानराव आवचार, श्री. पाडुरंगराव आढाव, श्री प्रताप काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या गरजेनुसार तंत्रज्ञान असले पाहिजे. अनेक शेतकरी कृषि तंत्रज्ञान प्राप्‍त करण्‍यासाठी अॅप्‍स व मोबाईलचा वापर करत असुन उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञान शेतकरी लगेच आत्‍मसात करतात. माहिती तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजातील अचुकता वाढवण्‍यासाठी होणे आवश्‍यक आहे. बाजारभावाची अदयावत माहीती व कृषि रसायनांच्‍या वापरातील बारकावे शेतक-यांना तात्‍काळ अवगत करणे, बियाणे व इतर निविष्‍ठांची माहीती देणे याबाबीसाठी माहिती तंत्रज्ञान वापर होणे गरजेचे आहे.
यावेळी श्री. समीर दुधगांवकर यांनी महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री अँड अॅग्रीकल्‍चर या संस्‍थेची कार्यप्रणाली सांगितली तसेच मुबंई येथे फेब्रुवारी मध्‍ये आयोजित माहिती तंत्रज्ञानाचा कृषि व पोषण विकासावरील आंतरराष्‍ट्रीय परिषदेबाबत माहिती देऊन सदरिल परिषदेत विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञांनी शोध निबंध पाठवुन सहभाग घ्‍यावा, असे आवाहन केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी विदयापीठाद्वारे विकसीत विविध अॅप व समाज माध्‍यमांचा वापर शेतकरी करीत असल्‍याचे नमुद केले.

कार्यशाळेत प्रगतीशील शेतकरी, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विदयार्थी यांच्‍या मध्‍ये या विषयावर सविस्‍तर चर्चा झाली.   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी.आर. देशमुख यांनी केले तर कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी प्रा. पी. एस. चव्‍हाण, प्रा. डी. डी. पटाईत, श्री. के. डी. कौसडीकर, श्री. बापुसाहेब कदम व महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.