Sunday, August 6, 2017

सद्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध पिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञाचा सल्‍ला
या वर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाले, जून महिन्यात चांगला पाऊस झाला, परंतु जुलै महिन्यामध्ये पाऊस अतिशय कमी झाला तसेच ऑगस्ट महिन्यामध्येही आत्ता पर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पीक परिस्थिती बिकट झाली आहे. पिकास पाण्याचा ताण पडत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत विविध पिकांमध्ये पुढील उपाय योजना कराव्यात.

कापूस - कापूस पिकामध्ये हलकी कोळपणी / वखरणी करावी, त्यामुळे मातीचे जमिनीवर आच्छादन तयार होते. तसेच जमिनीवरील पडलेल्या भेगा बुजतात व जमिनीच्या खालच्या भरातील ओलावा टिकून राहतो. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाने करून संरक्षित पाणी द्यावे. पोटेशियम नायट्रेट २०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते अन्नद्रव्य उपलब्ध होते.  मावा, पाने कुर्ताडणारे नागतोडे यांच्या नियंत्रणासाठी असिटामॅप्रिड ४ ग्राम किंवा डायमेथोएट २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

सोयाबीन - सोयाबीन पीक सध्या फुलोरा  अवस्थेत आहे, तुषार सिंचनाद्वारे उपलब्ध पाणी संरक्षित सिंचन द्यावे. पोटॅशियम नायट्रेट २०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते तसेच पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. जे पीक उशिरा जुलै मध्ये पेरले आहे, त्या पिकामध्ये वारंवार कोळपणी करावी, जेणे करून पडलेल्या भेगा बुजून ओलावा जास्त काळ टिकून राहील. सध्या पिकावर चक्रीभुंगा व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यासाठी ट्रायझोफॉस ४० % २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% प्रवाही २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, पवार स्प्रे करिता सदरिल कीटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे.

मूग - मूग पीक सध्या शेंगा वाढीच्या अवस्थेत आहे, या अवस्थेत पिकास पाण्याची गरज असते. उपलब्ध पाणी तुषार सिंचनाच्या वापर करून द्यावे. भुरी रोगासाठी १० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात विरघळणारी गंधकाची फवारणी करावी.

तूर - पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पिकात वारंवार कोळपणी करावी त्यामुळे जमिनीला पडलेल्या भेगा बुजून ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पाण्याची सोय असल्यास तुषार सिंचनाने पाणी द्यावे. काही ठिकाणी तुरीवर मररोग दिसून येत आहे, त्यासाठी कॉप्पर ऑक्सिक्लोरीड किंवा ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करावी.

असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले आहे.