Wednesday, July 19, 2017

मौजे किन्‍होळा (ता. मानवत) येथे शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवाद

विविध पिकांच्‍या पेरणीसाठी कमी कालावधीच्‍या वाणाची निवड करण्‍याचे वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्‍स फाऊंडेशन यांचे संयुक्‍त विदयमाने मौजे किन्‍होळा ता. मानवत येथे शेतकरी-शास्‍त्रज्ञ कार्यक्रमातंर्गत दिनांक 17 जुलै रोजी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ तथा विस्‍तार कृ‍षी विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व रेशीम संशोधन योजनाचे प्र‍भारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी खरीप हंगामातील पीक परिस्थिती व किड-रोग व्‍यवस्‍थापन या विषयावर संवाद साधला. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना डॉ. आळसे यांनी खरिप हंगामातील आपत्‍कालीन पीक नियोजनाचे महत्‍व विषद करतांना सुर्यफुल, तुर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तुर (४:२), बाजरी + तुर (३:३), एरंडी, कारळ, आणि तीळ या पिकांची पेरणी ३१ जुलै पर्यंत करता येईल असे सांगितले. पेरणीस जसजसा उशिर होईल तसतसे उत्‍पन्‍नात घट येते म्‍हणून पेरणीस विलंब झाल्‍यास वरीलप्रमाणे पीक नियोजन करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. विविध पिकांच्‍या पेरणीसाठी कमी कालावधीचे वाणाची निवड करावी, यात सोयाबीन चे एमएयुएस-७१, जेएस-९३०५, तुर मध्‍ये बीडीएन-७११, संकरीत बाजरी मध्‍ये एएचबी-१६६६, तीळ- जेएलटी-७, त्‍याचबरोबर दोन ओळीतील अंतर कमी करुन हेक्‍टरी झाडांची संख्‍या वाढवावी जेणे करुन उत्‍पन्‍न वाढेल. १५ जुलै नंतर कापुस, भुईमुग, खरिप ज्‍वारी हि पीके न घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
डॉ. लटपटे यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सल्‍ला दिला. जेणेकरुन निसर्गाचा समातोल राहिल, शेंदरी बोंड अळी सारख्‍या किडींचा उद्रेक होणार नाही, निसर्ग श्रृंखला अबाधीत राहील, मित्र किडींची संख्‍या वाढल्‍यामुळे किड व्‍यवस्‍थापन सोपे होईल. किटकनाशकांचा अतिवापर टाळावा. दोन किटकनाशक एकमेकांत मिसळून फवारणी करु नये असे आवाहन केले. शेतीमध्‍ये शाश्‍वतता आणण्‍यासाठी एक एकर तरी तुतीची लागवड करावी म्‍हणजे महिन्‍याला शेतक-यांच्‍या हाती पैसा खेळता राहील. भविष्‍यात रेशीम उदयोगाला फारशी स्‍पर्धा राहणार नाही. त्‍यामुळे रेशीम कोषाचे बाजारभाव ५० ते ६० हजार रुपये प्रति क्विंटल राहतील. वर्षाकाठी एक एकर मधून अडीच ते तीन लाख हमखास उत्‍पन्‍न मिळेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. याप्रसंगी शेतकरी श्री. हनुमान कदम यांचे शेतातील हळद पिकांची शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष पाहणी करुन सुक्ष्‍मअन्‍न द्रव्‍यांचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. श्री. विलास सवाने यांनी आभार मानले.