Thursday, March 23, 2017

वनामकृवितील पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने जागतिक जल दिन साजरा

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने दिनांक 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलसचिव डॉ. विलास पाटील हे होते तर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. विलास पाटील यांच्‍या हस्‍ते जलपूजन करण्यात आले. मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांनी जल प्रतिज्ञा देऊन सर्वांनी पाण्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर करून जलसंवर्धन करणे व जलप्रदूषण रोखण्यासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ विलास पाटील यांनी जल जागृती कार्यक्रम सर्व दूर साजरे करावेत अशी अपेक्षा व्‍यक्‍त करून इस्‍त्राईल व जर्मनी सारख्या देशांत पडणाऱ्या फार अल्‍प पावसाचा शेतकरी व नागरिक कशा पध्‍दतीने काटकोर उपयोग करतात हे सांगितले. प्रत्येक नागरिकाने स्वत:ची मानसिकता बदलुन पाणी बचत व पाणी सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून सिंचनाच्या पाळ्या ठरवाव्यात. सूक्ष्म सिंचनासह आच्छादनाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, तसेच घरगुती पाणी वापरात काटकसर करण्यासाठीचे अनेक उपाय त्‍यांनी सांगितले.    
यावेळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या सूक्ष्म सिंचन वरील प्रायोगिक प्रकल्पास उपस्थितांनी भेट दिली. तसेच ठिबक सिंचनावरील प्रायोगिक कोबी पिकाची काढणी मान्यवरांचे हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. हरीश आवरी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. रावसाहेब भाग्यवंत, प्रा. अशोक मंत्री, प्रा. अनिस कांबळे, श्री नंदकिशोर गिराम, दादाराव भरोसे, रत्नाकर पाटील, संजय देशमुख, प्रकाश मोते, विलास जाधव, प्रभाकर रनेर आदीसह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित मोठया संख्‍ये उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघा तर्फे वर्ष १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय जलदिन म्हणून पाळल्या जातो. रोजगार, शाश्वत विकास, उर्जा, सहकार, पर्यावरण, अन्न सुरक्षा अश्या विविध विषयांची दरवर्षी पाण्याशी सांगड घातली जाते. सन २०१७ ह्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने पाणी आणि सांडपाणी यावर भर दिलेला आहे.