Thursday, March 30, 2017

वनामकृवित मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृति आराखडा कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांकरिता दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 व 30 रोजी करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले. प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक तथा मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ उपस्थित होते.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी मराठवाडयातील शेतक-यांनी शेतीला जोडधंदयाची जोड दिल्‍यास निश्चितच शेतक-यांना एक चांगले आर्थिक पाठबळ मिळुन उत्‍पन्‍नात शाश्‍वती प्राप्‍त होऊ शकते, शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी मदत होईल. यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेऊन पशुसंवर्धन व दुग्धव्‍यवसाय सुरू करण्‍यास शेतक-यांना प्रोत्‍साहित करावे. कृषि विज्ञान केंद्रात चारा पिके व व्‍यवसायिक प्रशिक्षणावर भर देण्‍याच्‍या सल्‍लाही त्‍यांनी दिला. मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के दत्‍तात्री यांनी कृषि विज्ञान केंद्राचे पोर्टल अद्यावत करण्‍याचे व प्रत्‍येक विषय विशेषज्ञांच्‍या कार्याची माहिती दिली तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी सर्व कृषि विज्ञान केंद्र शास्‍त्रज्ञांनी विद्यापीठातील संकरित गौ पैदास केंद्रातील विविध चारा पिकांच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी कराण्‍याचे आवाहन केले.
प्रास्‍‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी गतवर्षी राबविण्‍यात असलेल्‍या अभियांत्रिकी उपकरणे, रूंद सरी वरंबा पध्‍दत व नगदी पीके या तीन सुत्री कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पी आर देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा पी एस चव्‍हाण, डॉ चिक्षे, श्री ढाकणे आदींनी सहकार्य केले.