Wednesday, December 28, 2016

ऊती संवर्धन तंत्रज्ञान आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

ऊती संवर्धनाच्‍या माध्‍यमातुन विविध पिकांच्‍या गुणवत्‍तेत व उत्‍पादकतेत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे, पंरतु हे तंत्रज्ञान आर्थिकदुष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने व भारत सरकारच्‍या जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या सौजन्‍याने चौदा दिवसीय दिनांक २७ डिसेंबर ते ९ जानेवारी दरम्‍यान वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्‍युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २७ डिसेंबर रोजी स‍दरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, विभाग प्रमुख तथा प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. डि. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आज ऊस व केळी ऊती संवर्धीत रोपांपासुन शेतकरी चांगले उत्‍पादन घेत आहेत, परंतु हया तंत्रज्ञानापासुन विकसित रोपांची किंमत अधिक असल्‍यामुळे त्‍याच्‍या वापरावर मर्यादा येत आहे. त्‍याकरिता ऊती संवर्धन तंत्रज्ञान कमी खर्चिक करण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांनी प्रयत्‍न करावा. आज मर्यादीत पिकांतच याचा वापर होत असुन तुर, हरभरा व इतर फळपिकांत याचा वापर शक्‍य आहे. देशाच्‍या वाढणा-या लोकसंख्‍येसाठी अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे यांनी आपल्‍या मार्गदर्शनात केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. डि बी देवसरकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ गोदावरी पवार यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात राज्‍यातील विविध विद्यापीठातील, महाविद्यालयातील व संशोधन केंद्रातील प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व प्रशिक्षणार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.