Tuesday, September 27, 2016

नॅनो तंत्रज्ञानाच्‍या आधारे खतांची कार्यक्षमता वाढवता येणे शक्‍य.......मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव

वनाकमृवित शाश्‍वत शेतीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर आयोजित व्‍याख्‍यानमालेत प्रतिपादन
नॅनो तंत्रज्ञानात शेती उत्‍पादन वाढविण्‍याची क्षमता आहे, परंतु नॅनो तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर व मानवी स्‍वास्‍थावर होणा-या परिणामाबाबत संशोधनाची गरज असल्‍याचे प्रतिपादन राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील जयशंकर तेलंगणा राज्‍य कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्‍ठाता तथा मृदाशास्‍त्रज्ञ मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्‍त्र विभाग व भारतीय मृदाविज्ञान संस्‍था परभणी शाखा यांच्‍या वतीने कै. डॉ. एन. पी. दत्‍ता मेमोरीयल व्‍याख्‍यानाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक २७ सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आले आहे, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर माजीमंत्री मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, भारतीय मृदाविज्ञान संस्‍था परभणी शाखेचे अध्‍यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, उपाध्‍यक्ष डॉ. सय्यद ईस्‍माइईया ल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव पुढे म्‍हणाले की, पीक वाढीकरिता रासायनिक खतांचा वापर करतांना खते प्रत्‍यक्षात कमी प्रमाणात पीकांना लागु होतात, नॅनो खतांचा वापर केल्‍यास रासा‍यनिक खतांचा कार्यक्षमरित्‍या वापर होउुन कमी खत मात्रेत अधिक उत्‍पादन आपण घेऊ शकु, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की, देशात युरिया या नत्र खताचा मोठया प्रमाणात वापर होतो, यासाठी मोठया प्रमाणावर सबसिडी दिली जाते. परंतु युरियाचा वापर करतांना त्‍याचा मोठया प्रमाणावर –हास होतो, ही हानी पाच टक्के जरी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून कमी केली, तरी मोठया प्रमाणावर आर्थिक बचत करू शकतो. कृषीक्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा उत्‍पादन वाढीसाठी वापर शक्‍य आहे, जैवसुरक्षीतता, पर्यावरण अनूकुलता व खर्च परिमाणकारकता आदीच्‍या दृष्‍टीने नॅनो तंत्रज्ञानाचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करावा लागेल. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतीय मृदविज्ञान संस्‍थेच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या व्‍याख्‍यानांचा उपयोग नवसंशोधकासाठी मार्गदर्शक आहे.

कार्यक्रमात डॉ. विलास पाटील, डॉ. डी. एन. गोखले व डॉ. अनिल धमक लिखित कृषीक्षेत्रातील नवीनतम संशोधन या पुस्‍तकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक डॉ विलास पाटील यांनी केले तर प्रमुख प्रमुख वक्‍त्‍याचा परिचय डॉ. सय्यद ईस्‍माइल यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. सुनिल गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, सदाशिव अडकीणे, एस एम महावलकर, अजय चरकपल्‍ली, शेख सलीम, विद्यार्थी स्‍वप्‍नील मोरे, प्रमोद शिनगारे आदीसह विभागातील इतर कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.