Wednesday, August 31, 2016

कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना शिक्षणाच्‍या आधारे नवनिर्मिती करण्‍याची संधी.....हिंगोलीचे जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक मोराळे

परभणी कृषी महाविद्यालयातील नुतन प्रवेशीत विद्यार्थ्‍यांच्‍या उद्बोधन कार्यक्रमात मार्गदर्शन
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना हिंगोली जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक मोराळे, व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ प्रल्‍हाद शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ उदय खोडके आदी
भारत कृषी प्रधान देश असुन कृषी तंत्रज्ञानाच्‍या जोरावर आपण हरित क्रांती केली, परंतु आज शेतकरी आत्‍महत्‍याचा गंभीर प्रश्‍न आपल्‍या समोर असुन कृषी पदवीधरांनी कृषी संशोधनाच्‍या आधारे उपाय शोधावेत. आज तरूणापुढे करिअरच्‍या दृष्‍टीने अनेक क्षेत्रे खुली आहेत, परंतु कृषी शिक्षणाच्‍या आधारे नवनिर्मीती करण्‍याची संधी कृषी पदवीधरांना आहे, अशा प्रकारची संधी क्वचितच इतर क्षेत्रात उपलब्‍ध असल्‍याचे प्रतिपादन हिंगोलीचे जिल्‍हा पोलीस अधिक्षक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. श्री. अशोक मोराळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्‍यांसाठी दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी आयोजीत उद्बोधन व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य तथा माजी शिक्षण संचालक मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, अध्‍यक्ष म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण उपस्थित होते तर प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्री. अशोक मोराळे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयास गौरवशील परंपरा असुन या महाविद्यालयात मिळालेल्‍या शैक्षणिक संधीचा फायदा घ्‍या. विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयीन जीवनात व्‍यक्‍तीमत्‍व विकासास मोठया वाव असतो, याच काळात आपली शैक्षणिक बाजु मजबुत करावी, विद्यार्थ्‍यांनी मेहनत करण्‍याची जिद्द ठेवली तरच जीवनात यशस्‍वी व्‍हाल. आज अनेक तरूण नैरश्‍याने ग्रासलेले आहेत, नैरश्‍यापासुन दुर राहण्‍यासाठी विद्यार्थ्यामध्‍ये खेडाळुवृत्‍ती विकासित झाली पाहिजे, यासाठी विद्यार्थ्‍यांनी विविध स्‍पर्धेत व खेळात सहभाग घ्‍यावा. कोणत्‍याही क्षेत्रात कार्य करतांना समाजाच्‍या हितासाठी व समाधानासाठी कार्य करावे. तरूणांनी माहिती तंत्रज्ञानाचा व समाज माध्‍यमाचा सकारात्‍मक वापर करण्‍याचा असा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे मार्गदर्शनात म्‍हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयास मोठी सांस्‍कृतिक वारसा असुन महाविद्यालयाने देशास व राज्‍यास अनेक कर्तबगार व्‍यक्‍ती दिले असल्‍याचे सांगुन आज विद्यार्थ्‍यामधील जिज्ञासुवृत्‍ती दुर्लभ होत असल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी पदवीधरास प्रशासन, संशोधन, व्‍यवस्‍थापन, राजकारण, स्‍वयं: रोजगार, शेती आदी क्षेत्रात मोठा वाव आहे. नुकतेच कृषी शाखेस तांत्रिक दर्जा मिळाल्‍यामुळे कृषी शिक्षणाचे महत्‍व वाढणार आहे. विद्य‍ार्थीदशेतच स्‍वत:च्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात चांगल्‍या गोष्‍टी बिंबवण्‍याचा प्रयत्‍न करावा व स्‍वत:तील दुगुर्णाचा त्‍याग करावा.
कार्यक्रमाचे प्रास्‍‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक यशाची माहिती दिली. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते महाविद्यालयाच्‍या गुणवंत विद्यार्थ्‍यीचा सत्‍कार करण्‍यात आला तर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी मनिषा गवळी व अभिजीत देशमाने यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आनंद कार्ले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापकवृंद, कर्मचारीवृंद, नुतन प्रवेशीत विद्यार्थ्‍यीचे पालक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
वनामकृविच्‍या परभणी कृषी महाविद्यालयात मान्‍यवरांसोबत नुतन प्रवेशित विद्यार्थ्यीीनी-विद्यार्थी