Friday, August 26, 2016

सद्यपरिस्थितीत घ्यावयाची भाजीपाला व इतर पिकांची काळजी

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
सध्या सर्वत्र पावसाचा ताण पडल्यामुळे पीक सुकत आहेत तसेच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणाचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो तसेच भाजीपाला व इतर पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसुन येतो, अशा परिस्थितीत शेतक-यांनी मुख्‍य खरीप पिकांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.
1.     मिरची पिकावर फुलकिडयाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास फिप्रोनिल 5 टक्के 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन साध्या पंपाने फवारावे. सोबत उच्च प्रतीचे स्टिकर वापरावे.
2.     काकडी वर्गीय भाजीपाला पिकांवर रसशोषण करणा-या किडींच्या व्यवस्थापनाकरिता इमिडाक्लोप्रिड 70 टक्के 1 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. सोबत उच्चप्रतीचे स्टिकर वापरावे.
3.     वांग्यामध्ये शेंडा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रादुर्भावग्रस्त शेंडे काढुन टाकावीत. व त्यानंतर क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच शेंडा व फळे पोखरणा-या अळीचे कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत
4.     हळदीचे कंद झाकुन घ्यावेत. हळदी मध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच निंबोळी तेल 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त झाडे काढुन नष्ट करावीत.
5.     हळदीमध्ये कंदमाशी व कंदकुजीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्यासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड 50 टक्के 25 ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 20 मि.ली. 10 लिटर पाण्यात टाकुन आळवणी करावी.
6.     उसामध्ये रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे, त्याकरिता शेताच्या कडेने असलेली प्रादुर्भावग्रस्त पाने काढुन नष्ट करावीत व मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के 10 मि.ली 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
7.     काही भागात गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे, अशा ठिकाणी त्यांच्या व्यवस्थापनाकरिता संध्याकाळी बाहेर निघालेल्या व दिवसा शेतात व बांधावरील गोगलगायी हाताने वेचून, त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. तसेच गोणपाट किंवा गवताचे ढीगगुळाच्या पाण्यामध्ये बुडवून संध्याकाळी शेतामध्ये जागोजागी ठेवावेत. दुस-या दिवशी सकाळी यावर आकर्षित झालेल्या गोगलगायी गोळा करुन नष्ट कराव्यात. शेतातील मुख्य पिकावर गोगलगाईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडेने चुन्याची भुकटी किंवा तंबाखुची भुकटी टाकावी. परंतु पाऊस पडल्यास याचा उपयोग होत नाही. तसेच मेटाल्डीहाईड 2.5 टक्के या गोगलगायनाशकाचा वापर करावा.
     अशा प्रकारे वरील प्रमाणे सध्याच्या वातावरणात आपल्या पिकाचे व्‍यवस्‍थापन व संरक्षण करावे. असे अवाहन संचालक विस्तार शिक्षण, डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. यू. एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.