Tuesday, March 29, 2016

कृषि पदवीधरांनी कृषि विकासासाठी योगदान द्यावे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित हवामान बदल विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवाद संपन्‍न
राष्ट्रीय परिसंवाद सहभागी शास्त्रज्ञ व मान्यवर
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु 
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथ

कृषिचे अनेक विद्यार्थ्‍यी उच्‍च पदवी प्राप्‍त करून इतर क्षेत्रात करिअर करतात, कृषि विकासात कृषि पदव्‍युत्‍तर व युवा संशोधकांच्‍या योगदानाची गरज आहे. कृषि पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी देशात आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या विविध राष्‍ट्रीय परिसंवाद व परिषदेत सहभाग नोंदवावा, यामुळे आंतरराष्‍ट्रीय व देशपातळीवरील शेतीमधील विविध घडामोंडींचे शास्‍त्रीय ज्ञान प्राप्‍त होते, अशा परिसंवादाचा लाभ विद्यार्थी संशोधकांनी घेवुन संशोधनाची दिशा निश्‍चीत करावी, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.  
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दृष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते, या परिसंवादाच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर, कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर माजी संशोधन संचालक डॉ. एस. टि. बोरीकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रभारी प्राचार्य डॉ. जी.एम. वाघमारे, परिसंवादाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. डी. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि संशोधनात सार्वजनीक व खाजगी संस्‍थेत समन्‍वयाची गरज असल्‍याचे मत माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले तर कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांनी विविध राष्‍ट्रीय परिसंवादाचा लाभ युवा शास्‍त्रज्ञांनी घेवुन प्राप्‍त ज्ञानाचा उपयोग संशोधनासाठी घेण्‍याचा सल्‍ला दिला. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात परिसंवादातील मुख्‍य शिफारसीचे वाचन करण्‍यात येऊन उत्‍कृष्‍ट सादरिकरणाबाबत विविध शास्‍त्रज्ञांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आर. सी. महाजन यांनी केले. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी झाले होते. साधारणत: १०० पेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञांनी संशोधन लेख सादर केले.
मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस.  नेरकर