Thursday, March 24, 2016

शेतीत शाश्वततेसाठी पाणलोटक्षेत्र विकास गरजेचे.......माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम. मायंदे

दोन दिवसीय वार्षिक आराखडा कार्यशाळेत केले कृषि विज्ञान केंद्राच्‍या तज्ञांना मार्गदर्शन
मराठवाडा विभागात जलसंवर्धनासाठी शास्‍त्रीयदृष्‍टया पाणलोटक्षेत्र विकास करणे गरजे असुन माथा ते पायथा पाणलोटक्षेत्राची आखणी केली पाहिजे, यातुन या भागातील शेतीत शाश्‍वतता येईल, असे प्रतिपादन अकोला येथील पंजाबराव देशमुख कृ‍षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही. एम. मायंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजना संशोधन संस्‍था यांच्‍यातर्फे दिनांक २१ व २२ मार्च दरम्‍यान दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विशाला पटणम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  माजी कुलगुरू मा. डॉ. व्‍ही एम मायंदे पुढे म्‍हणाले, की मागेल त्‍याला शेततळे योजनेत कृषि विज्ञान केंद्राच्‍या तज्ञांनी शास्‍त्रीय आधाराचे कार्य करावे. शास्‍त्रीय आधारावर तयार केलेले शेततळेच पुढे टिकतील. मराठवाडा विभागातील पिक पध्‍दती बदलत असुन प्रत्‍येक जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्रांनी आपआपल्‍या कार्यक्षेत्रातील या बदल प्रक्रियेचे निरिक्षण करून भविष्‍यातील शेतीचा वेध घ्‍यावा. परिस्थितीनुसार शेतकरी स्‍वत: आपल्‍या शेतीत नवनवीन प्रयोग घेतात, शेतक-यांनी अनुभवाने निर्मीत केलेले यशस्‍वी तंत्रज्ञानाचा विस्‍तार करावा. शेतकरी स्‍वावलंबी होईल यासाठी कृषि विस्‍तारकांनी कार्य करावे. आज शेती ही सुशिक्षीतांची शेती झाली असुन शेतक-यांच्‍या परिस्थिती व गरजेनुसार कौशल्‍य प्रशिक्षण दयावे लागेल. यावर्षी राज्‍य शासनने कृषी महोत्‍सव साजरा करण्‍याचे ठरविले असुन त्‍यात प्रत्‍येक जिल्‍हातील कृषी विज्ञान केंद्रांनी योगदान द्यावे. कृषी विस्‍तार कार्यात लोकप्रतिनिधीचा सहभाग आवश्‍यक असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
  सदरिल कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या विशेष विषय तज्ञांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी तर सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले.