Saturday, February 6, 2016

मौजे बाभुळगांव येथे शेतकरी शास्‍त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न

शेतीत विद्यापीठाच्‍या हवामान बदलानारुप नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानामुळे दुष्‍काळाची दाहकता कमी होण्‍यास मदत झाल्‍याची शेतक-यांचे मत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने दि. ३ जानेवारी रोजी हवामान बदलानारुप नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानावर आधारीत राष्‍ट्रीय उपक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या थेट संवादाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता, यात यशस्‍वी निक्रा योजनेतील शेतक-यांनी आपले मनोगत व अनुभव सांगितले.
हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर विशेष करुन गत दोन वर्षापासुन कमी पाऊस, भुर्गर्भातील खालवलेली पाण्‍याची पातळी, पिक उत्‍पादनातील घट, वैरणीची समस्‍या आदी अनेक समस्‍या शेतक-यांना भेडसवत असुन कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या निक्रा प्रकल्‍पांच्‍या अंतर्गत गेली तीन वर्षे मौजे बाभुळगांव येथे हवामान बदलानुरुप तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके शेतक-यांच्‍या शेतावर राबविण्‍यात येत आहेत. यात आंतरपीक पध्‍दती, रुंद वरंबा सरी पध्‍दत, कमी कालावधीचे व पाण्‍याचा ताण सहन करणारे पिकांचे वाण, ठिबक सिंचनाचा वापर, विहिर पुनर्भरण, कुपनलीका पुनर्भरण या माध्‍यमातुन पीक उत्‍पादन शाश्‍वतता आणण्‍यात यश आले तसेच आंतरपीक पध्‍दत, रुंद वरंबा, सरी पध्‍दत आदीमुळे उत्‍पादनात १८ ते २२ टक्‍के वाढ आढळुन आली. याच प्रकल्‍पांतर्गत शेतक-यासाठी अवजारे सुविधा केंद्रही चालवले जात आहे
या संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. आसेवार यांनी सदरिल योजनेची उदिष्‍टे सांगुन भविष्‍यात कमी पाण्‍यावर येणारी पिके जसे कुलथी, मटकी, बाजरी, तुर तसेच एकात्मिक शेती पध्‍दतीचा व शेटनेटचा अवलंब शेतक-यांनी करण्‍याचा सल्‍ला दिला. या संवाद कार्यक्रमात शास्‍त्रज्ञ प्रा. पेंडके एस. एम., डॉ. आनंद गोरे, श्रीमती सारीका नारळे, कृषि अधिकारी कृषि अधिकारी श्री सामाले यांनी शेतक-यांशी संवाद साधला.
यात अनेक शेतक-यांनी तंत्रज्ञान व याेग्‍य नियोजनाने दुष्‍काळी दाहकता कमी होण्‍यास मदत झाल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त केली. कमी पाण्‍यावरील पिकाबाबत आपले अनुभव प्रगतशील शेतकरी गिरीष पारधे यांनी सांगितले तर कृषि अवजारे सुविधा केंद्रात बीबीएफ यंत्राची गरज असल्‍याचे मत बालासाहेब मस्‍के यांनी व्‍यक्‍त केले. श्रीमती लक्ष्‍मीबाई, यांनी कांदा पिकासाठी ठिबक सिंचन उपकरणाची गरज असल्‍याचे सांगितले. बाबाराव पारधे यांनी हरभरी व कपाशीत ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेमुळे कमी प्रमाणात मर रोगाची लागण होते असे मत व्‍यक्‍त केले. यावेळी शेतकरी नारायण राऊत यांनी स्‍वखर्चान विहीर पुर्नभरणाचे संयत्र उभारल्‍याबाबत सर्वांनी अभिनंदन केले. ज्ञानेश्‍वर पारधे यांनी शेडनेट मधील मेथी, टोमॅटो, कांदे, चारा पिके घेऊन कमी पाण्‍यात अधिक उत्‍पादन एकात्मिक पिक पध्‍दतीने घेतलेल्‍या प्रक्षेत्रास सर्व शेतक-यांनी भेट दिली. कार्यक्रमास महिला शेतक-यांसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गिरीष पारधे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, माणिक समिंद्रे, किरण, सयद, जावेद, भंडारे आदींनी परिश्रम घेतले.