Friday, October 30, 2015

कृषि तंत्रज्ञान विस्‍तार क्षेत्रात वनामकृवि व रिलायंस फाउंडेशन यांच्‍या सामंजस्‍य करार

सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य कराराने आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान प्रसारास लागणार हातभार 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन यांचे दरम्‍यान कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसाराकरीता सामंजस्‍य करार दि ३० ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव, मुंबर्इ येथील रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार, रिलायंस फाउंडेशनचे प्रकल्‍प प्रमुख श्री सेंथीलकुमारन कृष्‍णन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व रिलायंस फाउंडेशनच्‍या वतीने मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या. या सामंजस्‍य करारानुसार ऑडिओ कॉन्‍फरन्‍स, व्हि‍डिओ क्लिप्‍स, मोबाईल संदेश, सामाजिक माध्‍यमे, चर्चासत्रे आदिंच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसार करण्‍यात येणार आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षात मराठवाडयातील शेतकरी विविध समस्‍यांना तोंड देत असुन शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे आवश्‍यक असुन मर्यादित मनुष्‍यबळाच्‍या सहाय्याने विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्य करीत आहे. अनेक वेळेस शेतीत तातडीने उपाय योजनेसाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाची गरज असते. योग्‍य तंत्रज्ञान, योग्‍य वेळेत, योग्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोहचविण्‍यासाठी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य करार करून आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त होईल. मराठवाड्यातील संकटग्रस्‍त शेतक-यांत उमेद जागृतीसाठीही याचा फायदा होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्‍या भाषणात सांगितले की, गेल्‍या तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर ऑडिओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातुन कृषि विस्‍तार कार्य करित असुन त्‍यास सामंजस्‍य करारामुळे अधिक व्‍याप्‍त स्‍वरूप प्राप्‍त होईल. रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी आपल्‍या भाषणात रिलायंस फाउंडेशन विविध सामाजिक कार्य करित असुन सामंजस्‍य करारामुळे मराठवाडयात विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसारास गती प्राप्‍त होऊन शेतक-यांना लाभ होऊल, असे सांगितले.  
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विठ्ठल गलबे, महिला शेतकरी करूणा खांदेलोटे व श्री पोले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविकात रिलायंस फाउंडेशनचे विभागीय समन्‍वयक श्री दिपक केकान गेल्‍यापासुन तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर राबवित असलेल्‍या कृषि विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्‍या तांत्रिक सत्रात हुमणी किडीच्‍या व्‍यवस्‍थापन व विविध पिक लागवडीबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, किडकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर, डॉ यु एन आळसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.