Monday, May 18, 2015

शेतक-यांच्‍या जीवनात कृषि विद्यापीठांचे स्‍थान महत्‍वाचे ....... कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे

वनामकृविच्‍या ख‍रीप पीक शेतकरी मेळावा मोठा प्रतिसाद
खरीप पीक शेतकरी मेळाव्‍याचे उद्घाटन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना प्रा राम शिंदे, सोबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, मा श्री केदार साळुंके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले आदी 
विद्यापीठाच्‍या शेती भाती मासिकाचे विमोचन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना राम शिंदे, डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही एम मायंदे, मा आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ ड‍ि एल जाधव आदी
कृषी राज्‍यमंत्री मा ना राम शिंदे यांच्‍या हस्‍ते वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी श्री पांडुरंग आवाड यांचा सत्‍कार करतांना डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही एम मायंदे, मा आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ ड‍ि एल जाधव आदी
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना प्रा राम शिंदे, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, माजी कुलगुरू डॉ व्‍ही एम मायंदे, आमदार रामराव वडकुते, आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदी
***************************
कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या बियाणास शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी, हेच शेतक-यांची विद्यापीठाप्रती असलेली विश्‍वासार्हता सिध्‍द करते. कृषि विद्यापीठांचे शेतक-यांच्‍या जीवनात महत्‍वाचे स्‍थान असुन विद्यापीठाची कृषि विस्‍तार यंत्रणा मराठवाड्यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यात बळकट करण्‍यासाठी येईल, असे प्रतिपादन कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ४३ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते. व्‍यासपीठावर मा. आ. मोहनराव फड, मा. आ. रामराव वडकुते, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री केदार साळुंके, माजी आ. विजयराव गव्‍हाणे, मा.श्री विठ्ठलराव रबदडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे पुढे म्‍हणाले की, हवामान बदलामुळे शेतीपुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या असुन मराठवाड्यात विशेषत: पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. येणा-या हंगामात पाऊसाचा थेंब न थेंब शिवारात व गावात आडवण्‍यासाठी व जिरवण्‍यासाठी शासनाने सुरु केलेल्‍या जलयुक्‍त शिवार महत्‍वकांक्षी कार्यक्रमामुळे शेतक-यांना निश्चितच लाभ होणार आहे. पाण्‍याचे स्‍त्रोत वाढविण्‍यासाठी वाटरबॅक संकल्‍पनेचा अवलंब करावा लागेल. आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात शेतक-यांनाही बदलावे लागेल, शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. येणा-या हंगामात प्रत्‍येक शेतक-यांना माती परिक्षण करुनच पिकांना खतांची योग्‍य मात्रा द्यावी यामुळे अनावश्‍यक खतांचा वापर टाळता येईल. तसेच पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पिक पध्‍दतीचा अवलंब करावा. इस्‍त्राईल शेती पध्‍दतीनुसार पॉलीहाऊस, शेडनेट आदींचा अवलंब करून शेतक-यांनी नियंत्रीत शेती करावी. शासनाने कृषि मुल्‍य आयोगाची स्‍थापना केली असुन शेतक-यांच्‍या कृषि मालाला उत्‍पादनावर आधारीत योग्‍य भाव देण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. शेतक-यांमध्‍ये उमेद निर्माण करण्‍यासाठी व आत्‍मविश्‍वास वाढीसाठी शासन व विद्यापीठ शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीर उभे आहे. कृषि संशोधनासाठी शासनस्‍तराला जास्‍तीत जास्‍त अनुदानाची तरतुद करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात जाईल. विद्यापीठ निर्मित उतीसंवर्धन रोपांना शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी असुन या प्रयोगशाळेच्‍या बळकटी करणासाठी विद्यापीठाने सादर केलेल्‍या तीन कोटीचा प्रस्‍ताव मंजुर करण्‍यात येत आहे, अशी घोषणा यावेळी त्‍यांनी केली.  
अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतक-यांसाठी विविध पिकांचे १०० पेक्षा जास्‍त वाणे व शेकडो तंत्रज्ञान विकसीत केले आहे, हेच विद्यापीठाच्‍या ४२ वर्षाच्‍या कारकिर्दीचे प्रमाणपत्र आहे. मराठवाड्यातील ८७ टक्‍के शेती ही कोरडवाहु असुन अपुरे सिंचन, सतत दुष्‍काळ, पावसाची अनियमितता यामुळे शेतक-यांसमोर अनेक समस्‍या आहेत. यासाठी शासन राबवित असलेले जलयुक्‍त शिवार कार्यक्रमामुळे पावसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या वापर होऊ शकेल. तसेच पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमाच्‍या धर्तीवर शेतीचा विकास होणे गरजेचे आहे. शेतक-यांनी विद्यापीठांनी विकसीत केलेल्‍या कोरडवाहू तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. विविध पिकांत रुंद सरी व वरंबा पध्‍दतीचा अवलंब करावा, शेतीमध्‍ये यांत्रीकीकरण काळाची गरज असुन कृषि अवजार बॅकेची स्‍थापना करावी. शासन अनेक विमा योजना राबवित असुन त्‍याची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचवावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतक-यांमध्‍ये विद्यापीठ बियाणाबाबत मोठी मागणी असुन विद्यापीठाचा येणा-या काळात अधिक बीजोत्‍पादन करण्‍याचा मानस असुन बिजोत्‍पादनासाठी अधिक सिंचन सुविधासाठी प्रस्‍ताव शासनास सादर केलेला आहे. विद्यापीठातील मनुष्‍यबळाच्‍या कमतरतेवर लवकरच तोडगा काढण्‍यात येणार आहे. मराठवाडयातील कापुस हे मुख्‍य नगदी पिक असुन विद्यापीठ विकसित नांदेड-४४ हा शेतक-यांत लोकप्रिय असलेला वाण लवकरच बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी येणार आहे. विद्यापीठाने महाबीजशी सामंजस्‍य करार केलेला असुन येत्‍या दोन ते तीन वर्षात नांदेड-४४ चा बीटी वाण शेतक-यांना उपलब्‍ध होईल. विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यात अधिक मजबुत करण्‍याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. केदार साळुंके यांनी शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे मत आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची मा‍हिती देवुन विद्यापीठ आत्‍पकालीन पिक पध्‍दतीचा नवीन आराखडा शेतक-यांना लवकरच उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ माधुरी कुलकर्णी व प्रा. अरुण गुट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले.
याप्रसंगी मराठवाड्यातील कृषि पुरस्‍कार प्राप्‍त शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला, यात पांडुरंगराव आवाड, आनंतराव देशमुख, विजयराव नरवाडे, भिकनराव वराडे, नामदेव जगदाळे, नारायण चौधरी, भिमराव कदम, शेषराव निरस, उत्‍तमराव भोसले, केदार जाधव, दत्‍तप्रसाद मुंदडा आदिंचा समावेश होता. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांचे बियाणे विक्रीचे उद्घाटन करण्‍यात आले तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित शेतीभाती मासीकाचे व विविध प्रकाशनाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
मेळाव्‍याप्रसंगी आयोजित परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन, डॉ. एस. पी. मेहत्रे यांनी सोयाबीन लागवड, प्रा. ए. जी. पंडागळे यांनी कापुस लागवड यावर मार्गदर्शन केले. कोरडवाहु फळपिके व शेडनेट तंत्रज्ञान यावर डॉ. ए. एस. कदम, एकात्मिक तणव्‍यवस्‍थापन यावर डॉ. ए. के. गोरे, शेतीचे यांत्रीकीकरण यावर प्रा. पि. ए. मुंढे, ठिंबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्‍यवस्‍थापन यावर डॉ. उदय खोडके, कडधान्‍य लागवड तंत्रज्ञान यावर प्रा. पि. ए. पगार यांनी तर एकात्मिक अन्‍नद्रव्‍य  व्‍यवस्‍थापन यावर डॉ. हरीहर कौसडीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतक-यांच्‍या विविध शेती विषयक शंकांचे शास्‍त्रज्ञांनी समाधान केले. या प्रसंगी कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍यास शेतकरी बंधुभगिनींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
विद्यापीठा विकसित बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना
कृषी प्रदर्शनीतील किडकशास्‍त्र विभागाच्‍या दालनाची पाहणी करतांना