Saturday, April 4, 2015

रासेयो हि स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारी योजना होय……संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च २०१५, मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले तर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
     राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन जीवनात युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रेरणा देणारी, स्वयंसेवकांच्या मनात श्रमप्रतिष्ठा निर्माण करणारी, समाजाशी नाळ जोडणारी, सामाजिक कर्तव्य भावना निर्माण करणारी हि योजना असल्याचे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले. युवकांच्या व्यक्तिमत्व विकास साधताना समाजसेवा व राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हि योजना विद्यापीठात राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांनी केले.
     प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले यांनी युवकांमधील स्पर्धात्मक दृष्टीकोन, सामाजिक सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर प्राचार्य डॉ. उदय खोडके म्हणाले कि, रासेयो मुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व पायाभरणी होत असते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, प्रा. विजय जाधव व विद्यापीठातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.