Monday, November 17, 2014

मराठवाडयातील हवामान व पाऊस रब्‍बी हंगामासाठी पोषक

परभणी : मागील काही दिवसांपासुन राज्‍यात तसेच मराठवाडयातील काही भागात बेमोसमी पाऊस पडला आहे. ज्‍या भागात जमिनीतील ओलाव्‍यात वाढ झाली, त्‍याभागात रब्‍बी हंगामातील गहु, करडई व हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. करडई हे पीक कमी पाण्‍यावर तसेच जमिनीतील उपलब्‍ध ओलाव्‍यावर घेऊन सद्यस्थितीत पडणा-या अवकाळी पावसाचा करडई पीकाला फायदा होऊ शकतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेल्‍या करडईच्‍या परभणी-१२ (परभणी कुसुम) व परभणी-४० या वाणांचा उशिरा पेरणीसाठी वापर करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडे परभणी-१२ या करडईच्‍या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्‍ध असुन शेतकरी बांधवांनी सदरिल वाणाची पेरणी करावी व पडलेल्‍या पावसाचा फायदा घ्‍यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. परभणी-१२  या करडईच्‍या वाणाची सत्‍यतादर्शक बियाणाच्‍या पाच किलो वजनाच्‍या पिशवीची किंमत ३७५ रूपये आहे. तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहु पिकात लोकवन वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्‍पादन अधिकारी डॉ एस बी घुगे (९४२१४६०१४३) यांच्‍याशी संपर्क करावा.