Saturday, May 17, 2014

वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍यात शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४२ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी व महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. १८ मे २०१४ रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारती जवळील नविन पद्व्‍युत्‍तर वसतीगृह मैदानावर खरीप शेतकरी मेळावा आयोजित करण्‍यात आला असुन या मेळाव्‍याचे उद्घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक तथा धारवाड (कर्नाटक) येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांच्‍या हस्‍ते होणार आहे. विशेष अतिथी म्‍हणुन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे यांची उपस्थिती लाभणार असुन अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु राहणार आहेत.
तांत्रिक सत्रात शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन 
या प्रसंगी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ तांत्रिक सत्रात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, खरिप पिकातील किडी व रोग व्‍यवस्‍थापन, बीटी कापुस लागवड, कडधान्‍य आधारित पीक पध्‍दती, खरिप ज्‍वार लागवड तंत्र व प्रक्रिया उद्योग, आपतकालीन पीक नियोजन व कोरडवाहु शेती व्‍यवस्‍थापन, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, ऊस, हळद व आद्रक लागवड, शेतीचे यांत्रिकीकरण, शेततळे, तण नियंत्रण, शेडनेट/हरितगृह तंत्रज्ञान आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेवटी शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान विद्यापीठ शास्‍त्रज्ञ करणार आहेत तसेच कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे.
विद्यापीठ बियाणे विक्रीचे उदघाटन
दरवर्षी प्रमाणे विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार असुन मुग, उडीद, तुर, खरीप ज्‍वारी आदी पिकांच्‍या विविध वाणाचे बियाणे मर्यादित स्‍वरूपात विक्रिसाठी उपलब्‍ध होणार आहे. परंतु मागील हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्‍या काळात झालेल्‍या वादळी पाऊस व अतिवृष्‍टीमुळे सोयाबीनच्‍या बियाण्‍याच्‍या गुणवत्‍तेवर मोठा परिणाम झाला असुन उगवण क्षमता कमी असल्‍या कारणाने यंदा सोयाबीन बियाणाची उपलब्‍धता विद्यापीठाकडुन होऊ शकणार नसल्‍याचे प्रशासनाने कळविले असुन विद्यापीठाने त्‍याबाबत दिलगिरी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यामुळे शेतकरी बांधवानी स्‍वत:चे घरगुती सोयाबीन बियाणाचा वापर करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक यांनी केले असुन याबाबतचे सविस्‍तर मार्गदर्शन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मेळाव्‍यात करणार आहेत.  
पुरस्‍कार प्राप्‍त शेत‍क-यांचा सत्‍कार
मेळाव्‍या प्रसंगी विद्यापीठाच्‍या वतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन 2012 मधील मराठवाडा विभागातील महाराष्‍ट्र शासन कृषि पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी बांधवाचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे.
मेळाव्‍यास शेतकरी बांधवानी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले आहे.