Friday, December 13, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान २७.० ते २९.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी २.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३९.० ते ७०.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९.० ते ३२.० टक्‍के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात सौम्‍य थंडी राहून आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडयातील शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

रब्‍बी  ज्‍वार
खोडमाशी
हलक्‍या प्रतिच्‍या जमीनीत ज्‍वारीची पेरणी केली असल्‍यास खुरपणी करून संरक्षीत हलके पाणी द्यावे. मध्‍यम ते भारी जमीनीत पेरणी केलेल्‍या ज्‍वारीचे पीक खुरपणी करून तणविरहीत ठेवावे. डुकराचा प्रादूर्भाव ज्‍या ठिकाणी दिसून येत असेल अशा ठिकाणी तातपुरते तारेचे तयार करावे.    
करडई
मावा
करडईचे पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणासाठी डायामिथोएट ३० टक्‍के १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
हळद
कंद माशी
हळदीचे पिकास नियमीत पाणी द्यावे. ज्‍या ठिकाणी कंद माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असेल अशा ठिकाणी फोरेट १० जी हेक्‍टरी ६ किलो जमीनीतून द्यावे.
केळी

केळीच्‍या मृगबागेस खते देणे बंद करावे. केळीचे बागेस नियमीत पाणी द्यावे. केळीची कांदे बाग लागवड केली असल्‍यास नत्राचा दुसरा हप्‍ता ८२ ग्रॅम युरीया दिला नसल्‍यास प्रति झाड देउन पाणी द्यावे. थंडीपासून सरंक्षण करणे करिता बागेस सजिव कुंपणाची वाढ होउ द्यावी.
आंबा

नविन लागवड केलेल्‍या आंब्‍याच्‍या बागेस नियमीत पाणी द्यावे. जुन्‍या बागेचे पाणी देणे बंद ठेवावे. आंब्‍यावरील तुडतुडे किडीच्‍या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन खोडासह फवारणी करावी. मागील पंधरवाडयात झालेल्‍या अवकाळी पाउस व धुक्‍यामुळे भुरीरोगाचा प्रादूर्भाव आढळुन येत आहे. त्‍याचे नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. 
अंजीर

आंबेबहार धरण्‍याकरीता अंजीराचे बागेस अंतरमशागतीची कामे करून बाग स्‍वच्‍छ ठेवावी. हस्‍तबहार घेतलेल्‍या बागेतील पक्‍व फळांची काढणी व प्रतवारी करून कागदी पेटयातून विक्रीसाठी पाठवावीत. 
चिकु

बागेस नियमीत पाणी द्यावे. 
फुलशेती

अॅस्‍टरची लागवड केलेल्‍या फुलपिकास नत्राची मात्रा देउन पाणी द्यावे. गुलाबाच्‍या फुलांची नियमीत काढणी करून विक्रीसाठी पॅकींग करून बाजार पेठेत पाठवावी. पिकास नियमीत पाणी द्यावी.
कृषि अभियांत्रीकी : परतीच्‍या मान्‍सुन ज्‍या ठिकाणी पडला तेथे सध्‍या पिकांना पाणी देण्‍याची आवश्‍यकता नाही. पूर्ण रब्‍बी हंगामात पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन व्‍यवस्थित करावे. शेतीच्‍या पाण्‍याचे काटेकोरपणे नियोजन गरजेचे आहे. त्‍यामुळे उन्‍हाळयात पाण्‍याची कमतरता येणार नाही. 

सौजन्‍य
केंद्र प्रमुख, ग्रामिण कृषि मौसम सेवा
कृषि हवामानशास्‍त्र विभाग
पञक क्रमांकः ६६, दिनांकः १३.१२.२०१३