Sunday, December 1, 2013

मला यशस्‍वी व्‍हायचंय हाच निश्‍चय तुम्‍हाला यशाकडे घेऊन जातो ...पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या वतीने संकल्‍प व्‍याख्‍यानमालेत पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील मार्गदर्शन करतांना, व्‍यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी बी देवसरकर, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष एस जी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे आदी

अर्जुनाला जसा पक्षाचा फक्‍त डोळाच दिसत होता त्‍याप्रमाणे तुम्‍ही ध्‍येयाकडे पाहा, मला यशस्‍वी व्‍हायचयं हाच निश्चिय तुम्‍हाला यशाकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या वतीने संकल्‍प व्‍याख्‍यानमालेत दि 01 डिसेंबर 2013 रोजी पोलीस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांचे राष्ट्रिय नागरी सेवा परीक्षेची तयारी यावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डी बी देवसरकर, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष शिवाजी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे उपस्थित होते.
मा श्री संदिप पाटील पुढे म्‍हणाले कि, नागरी सेवेकडे अनेक विद्यार्थी आर्कषित होतात कारण नौकरीची शाश्‍वतता, समाजात मान व ओळख तसेच सर्वसामान्‍य विद्यार्थ्‍याना असामान्‍य होण्‍याची संधी आहे. यशाचे सुत्र सांगतांना ते म्‍हणाले कि, ध्‍येय स्पष्‍टता, ध्‍येयाप्रती प्रामाणिक प्रयत्‍न, गुणवत्‍ता वाढीस प्रयत्‍न, प्रयत्‍नात सातत्‍य, कामगिरी उंचावण्‍यासाठी प्रयत्‍न ही सहा तत्‍वे महत्‍वाची आहेत.

अभ्‍यास कसा करावा यासाठी त्‍यांनी पी क्‍यु आर एस टी (PQRST) हा मंत्र दिला, ते म्‍हणाले कि, पी म्‍हणजे प्रीव्‍हयु – पुर्ण विषयाचे पुर्वावलोकन करा, क्‍यु म्‍हणजे क्‍वेस्‍वनिंग – प्रश्‍नार्थक दृष्टिने विषयाकडे पाहा, आर म्‍हणजे रिडींग – प्रत्‍यक्ष विषयाचे वाचन, एस म्‍हणजे स‍मरी – सारांश काढणे व शेवटी टि म्‍हणजे टेस्‍टींग – चाचणी परिक्षा यापध्‍दतीने प्रत्‍येक विषयाचा अभ्‍यास केला तर निश्चितच चांगले गुण प्राप्‍त होऊ शकतात.

अभ्‍यासासाठी दिवसातुन किमान गुणात्‍मक 10 ते 12 तास दया, तसेच कमीत कमी अर्धा तास ताण कमी करण्यासाठी व्‍यायाम करा. मराठी विद्यार्थ्‍यांमध्‍ये गुणवत्‍ता आहे परंतु मनात एक न्‍युनगंड असतो. कृषि विद्यापीठात स्‍पर्धपरिक्षेसाठी पोषक वातावरण आहे, कृषि विद्यापीठाची गौरवशाली परंपरा आहे, या विद्यापीठाने अनेक प्रशासक राज्‍याला दिले आहेत, सकारात्‍मक दृष्टिकोन ठेऊन प्रयत्‍न करा शेवटी यश तुम्‍हचे आहे, असा प्रेरणादायी उदगार त्‍यांनी काढले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंच विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनी 2001 साली स्‍थापन केला असुन या मार्फत स्‍पर्धापरीक्षेच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, चाचणी परिक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात यासाठी विद्यापीठ मंचास मुलभुत सुविधा उपलब्‍ध करून देते.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मंचाचे अध्‍यक्ष श्री अमोल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दादासाहेब हाकाळे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजित सानप, नितीन लिंगायत, सतीश काकडे, अनिल खिलतकर, अरूण सिरसाट, ज्‍योती रामदिनलवार, पल्‍लवी पवार व मंचाच्‍या सदस्‍यांनी परीश्रम घेतले.
साधारणता 1000 विद्यार्थी व विद्यार्थीनी कृषि महाविद्यालयाच्‍या भरगच्‍च सभागृहात तब्‍बल सव्‍वादोन तास श्री संदिप पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थीशी थेट संवाद साधुन स्‍पर्ध परिक्षेबाबत शंकाचे समाधान केले.