Friday, May 10, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगांव ता. औंढा नागनाथ येथे कृषि महाविद्यालयास शासनाची मान्‍यता



महाराष्‍ट्र शासनाच्‍या मंत्रीमंडळाच्‍या दिनांक 8 मे 2013 रोजी संपन्‍न झालेल्‍या बैठकीत गोळेगांव ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालयास शासनाची मान्‍यता देण्‍यात आली. हिंगोली जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च कृषि शिक्षणाचे दालन उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणुन मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्‍ह्यातील गोळेगांव ता. औंढा नागनाथ येथे घटक कृषि महाविद्यालय स्‍थापनेचा प्रस्‍ताव महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्‍णजी विखे पाटील व कळमनुरीचे आमदार मा.श्री.राजीवजी सातव व मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली शासनाच्‍या मान्‍यतेस्‍तव सादर करण्‍यात आला होता. तसेच यासाठी वसमतचे आमदार मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर व हिंगोलीचे आमदार मा.श्री.भाऊराव पाटील गोरेगांवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुलगुरु डॉ.किशनराव गोरे यांच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नामुळे महाराष्‍ट्र शासनाने कृषि महाविद्यालय, गोळेगांव ता. औढा नागनाथ येथे 60 विद्यार्थ्‍यांच्‍या प्रवेश क्षमतेसह मान्‍यता दिली आहे. 1972 साली मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्‍थापना गोळेगांव येथे होणार होती, परंतु ते स्‍वप्‍न आज 41 वर्षानंतर शासनाच्‍या सकारात्‍मक निर्णयामुळे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने पुर्ण झाले आहे.
     या महाविद्यालयासाठी शासनाने एकुण 65 पदांना मंजुरी दिली असुन 28 शिक्षकवर्गीय पदे त्‍यामध्‍ये सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, सहयोगी प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक, प्रक्षेत्र अघिक्षक व वसतीगृह अधिक्षक तसेच 37 शिक्षकेत्‍तर कर्मचारी पदे यामध्‍ये सहाय्यक ग्रंथपाल, लघुलेखक, सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक नियंत्रक, भांडारपाल, वरीष्‍ठ लिपीक, पहारेकरी, प्रयोगशाळा परिचर इत्‍यादी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पुढील पाच वर्षासाठी एकुण आवर्ती खर्च रुपये 947.32 लक्ष व अनावर्ती खर्चासाठी रुपये 2918.53 लक्ष अशा प्रकारे एकुण रुपये 3865.85 लक्ष इतक्‍या खर्चाच्‍या प्रस्‍तावास प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता देखील देण्‍यात आली आहे. या महाविद्यालयात चार वर्षाचा बी. एस्‍सी. (कृषि) पदवी अभ्‍यासक्रम शिकविण्‍यात येणार आहे. सदरील अभ्‍यासक्रमात कृषिविद्या, किटकशास्‍त्र, वनस्‍पतीशास्‍त्र विकृतीशास्‍त्र, कृषि अभियांत्रीकी, कृषि अर्थशास्‍त्र, कृषि विस्‍तार शिक्षण, पशु संवर्धन व दुग्‍धशास्‍त्र व्‍यवसाय, कृषि वनस्‍पतीशास्‍त्र, कृषि मृद व रसायनशास्त्र, उद्यानविद्या इत्‍यादी कृषि संबंधीत विषयांचा समावेश राहाणार आहे. यामुळे या परिसरातील‍ विद्यार्थ्‍यांना मोठा लाभ होणार असून त्‍यांच्‍यातील कृषि क्षेत्राच्‍या संदर्भातील गुणांना वाव मिळणार आहे.
     विद्यापीठामार्फत या भागात अनेक पाणलोट क्षेत्र उभारण्‍यात आली आहेत. या महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेमुळे या भागाचा कृषि विकासासाठी अधिक पोषक वातावरण निर्माण होऊन येत्‍या काळात एकुणच जिल्‍ह्याच्‍या विकासात भर पडणार आहे. या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून कृषि शिक्षणाबरोबरच संशोधनालाही चालना मिळून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचवून शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न होईल. यामुळे जिल्‍ह्यात कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यास चालना मिळवून या भागातील शेती व शेती संलग्‍न क्षेत्राच्‍या विकासासाठी पर्यायाने शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. सोबतच या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातुन या भागातील विविध पिकांबरोबरच मधुमक्षीका पालण, कोरडवाहू फळपिके, प्रक्रिया उद्योग, बिजोत्‍पादन, शेती पुरक ऊद्योग धंदे इत्‍यादींना निश्‍चीतच चालना मिळणार आहे आणि यातुन या भागातील शेतक-यांची आर्थीक प्रगती होईल असा विश्‍वास वाटतो. कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेनंतरही या भागातील कृषि विकासासाठी मसाले संशोधन केंद्र, औषधी व सुंगधी वनस्‍पती प्रकल्‍प स्‍थापनेच्‍या दृष्‍टीने विद्यापीठाचे प्रयत्‍न सुरू आहेत. एकुणच या महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून शेतक-यांचा सर्वांगीण प्रगती साधण्‍यासाठी उपयोग होईल.
     हिंगोली जिल्‍ह्यातील शेतक-यांमध्‍ये व जनतेमध्‍ये या महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेमुळे उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले असून राज्‍याचे कृषिमंत्री मा.ना.राधाकृ‍ष्‍ण विखे पाटील, वसमतचे आमदार मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर, हिंगोलीच आमदाम मा.श्री.भाऊराव पाटील गोरेगांवकर, कळमनुरीचे आमदार मा.श्री.राजीवजी सातव व मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांचे विविध स्‍तरातुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. सदरील प्रस्‍तावाचा पाठपुरावा कुलगुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.