Tuesday, May 28, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीचे मा. मुख्‍यमंत्री महोदयाच्‍या हस्‍ते उद्घाटन

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीचे मा. मुख्‍यमंत्री महोदयाच्‍या हस्‍ते उद्घाटन

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक 30 मे ते 1 जुन, 2013 या कालावधीत परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहे. 30 मे रोजी सकाळी 10.30 वाजता राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते सदरील बैठकीचे उदघाटन होणार असून कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍णजी विखे पाटील अध्‍यक्ष म्‍हणून लाभणार आहेत. या बैठकीस उच्‍चतंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. राजेशजी टोपे, कृषि राज्‍यमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव देवकर, परभणीचे पालकमंत्री तथा महसुल राज्‍यमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके, महिला व बालविकास राज्‍यमंत्री मा.ना.प्रा.फौजिया खान, वैद्यकीय शिक्षण राज्‍यमंत्री मा.ना.श्री.डी.पी.सावंत, महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते, तसेच राज्‍याचे मुख्‍य सचिव मा.श्री.जयंतकुमार बांठिया, अव्‍वर मुख्‍य सचिव (कृषि) डॉ.सुधीरकुमार गोयल, यांच्‍यासह अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे, नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. ए. के. मिश्रा, कृषि परिषदेचे महासंचालक मा.श्री.एन.एच.सावंत आदींची उपस्थिती लाभणार असून मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे हे बैठकीचे स्‍वागताध्‍यक्ष आहेत. 

राज्‍यातील कृषि विद्यापीठांनी केलेल्‍या संशोधनामुळे नजीकच्‍या काळात विविध पिकांचे उत्‍पादन व उत्‍पादकता यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे, असे असले तरी हवामान बदलामूळे तसेच आजची दुष्‍काळग्रस्‍त परिस्थिती, लोकसंख्‍या वाढीमुळे निर्माण झालेल्‍या अन्‍न सुरक्षतेचा प्रश्‍न, जमिनीची -हास होणारी सुपिकता व कृषि उत्‍पादनाचे विविध कारणामूळे होणारे नुकसान यामूळे कृषि विकासाच्‍या वाढीवर मर्यादा येत आहेत. या अनुषगांने कृषि विद्यापीठांनी केलेल्‍या संशोधनातून शेतक-यांना उपयुक्‍त असे शाश्‍वत उत्‍पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरित वाण, पशुधनाच्‍या सुधारित प्रजाती, पिक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, एकात्मिक कीड व रोग व्‍यवस्‍थापन, मृद व जलसंधारण इत्‍यादी सारख्‍या अनेक महत्‍वाच्‍या शिफारशी उपरोक्‍त बैठकीच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात आणि या शिफारशी शेतक-यांना उत्‍पादन वाढीसाठी उपयोगी ठरतात.

संशोधनावर आधारित या शिफारशी सदरील बैठकीच्‍या माध्‍यमातून शेतक-यांसाठी प्रसारित केल्‍या जातात. राज्‍यातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने सर्वात महत्‍वाची बाब म्‍हणजे विविध पिकांचे अधिक उत्‍पादन देणारे 15 ते 20 नवीन वाणा शिफारशीसाठी चर्चेत येणार आहेत. या व्‍यतिरीक्‍त राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांत झालेल्‍या संशोधनांबाबत जवळपास 200 तंत्रज्ञान शिफारशी या बैठकीत मांडल्‍या जाणार आहेत.

मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारीत एकूण 63 शिफारसी मांडण्‍यात येणार असुन यात चार प्रसारित वाण, 3 पुर्व प्रसारीत वाण, 4 कोरडवाहू तंत्रज्ञान, 3 पिक संरक्षण, 3 मृद व रसायन शास्‍त्र, 1 बीजप्रक्रिया, 1 जैवतंत्रज्ञान, 4 पशु विज्ञान व दुग्‍धशास्‍त्र, 3 उद्यानविद्या, 1 तण नियंत्रण, 4 गृहविज्ञान, 7 अन्‍न तंत्रज्ञान, 2 पाणी व्‍यवस्‍थापन, 19 कृषि अभियांत्रिकी, 4 सामाजिक शास्‍त्रातील शिफारसी या बैठकीत मांडण्‍यात येणार आहेत. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन, काबुली हरभराचा एक व सिताफळाचा एक वाणाची शिफारस प्रसारणासाठी मांडण्‍यात येणार आहे.

या सर्वांवर तांत्रिक चर्चासत्रात होऊन शेवटी शेक-यांसाठी प्रसारित करण्‍यासाठी त्‍यास अंतिम मान्‍यता देण्‍यात येणार आहे. तीन दिवस चालणा-या या बैठकीच्‍या चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणता 300 कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग नोंदविणार असून प्रथम सत्रामध्‍ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत असलेल्‍या महाराष्‍ट्रातील 9 संशोधन संस्‍थांचे संचालक, तसेच शास्‍त्रज्ञ, राज्‍य शासनाच्‍या विविध विभागाचे 18 आयुक्‍त पदाचे अधिकारी, कृषि विषयक खाते प्रमुखांचे राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.

१ जून रोजी अमेटी विद्यापीठाचे गुरगांव (हरियाना) येथील संचालक डॉ. पॉल खुराणा यांचे कृषि विकासासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर विचार मांडणार असून नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. सी. देवकुमार हे कृषि संशोधनाच्‍या नविन दिशा या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. जेनेटीकली मॉडीफाईड (जीएम) पिकांचा परिणाम व धोरणे या विषयावर नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. आर. क्रांती तर मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. एस. के. चटोप्‍पाध्‍याय यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्‍स शिक्षण संस्‍थेचे संचालक डॉ. डब्‍ल्‍यू. एस. लाक्रा तसेच बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. पि. एस. मिन्‍हांस, सोलापूर येथील राष्ट्रिय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. जी. अडसूळ, नागपूर येथील राष्ट्रिय लींबुवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. व्‍ही. जे. शिवणकर, राष्ट्रिय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामकृष्‍ण पाल, नागपूर येथील राष्ट्रिय मृद सर्वेक्षण व जमिन वापर योजना केंद्राचे संचालक डॉ. दिपक सरकर, कांदा व लसुन संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. जय गोपाल यांचे त्‍याच्‍या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्‍मक सादरीकरण राहणार आहे. याप्रकाराचे वैविध्‍यपुर्ण संशोधनात्‍मक सादरीकरण प्रथमच या बैठकीतुन करण्‍याचे मा. कुलगुरू डॉ के. पी. गोरे यांच्‍या कल्‍पनेतुन आयोजीत केले आहे. यामुळे या सर्व राष्‍ट्रीय संस्‍थांच्‍या संचालक व शास्‍त्राज्ञांची व्‍याख्‍याने व सादरीकरणे राज्‍यातील कृषि संशोधकांना मार्गदर्शक ठरणार आहेत, हे निश्चित.

अशा प्रकारे तांत्रिक सत्राच्‍या एकूण 11 गटांमार्फत विविध शिफारशींवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्‍या पहिल्‍या गटात शेतपिकांचे विविध नवीन वाणांचे प्रसारण संरक्षण यावर शिफारशी प्रसारित होणार आहेत. द्वितीय गटामध्‍ये  फळे, भाजीपाला फुले यांच्‍या वाण प्रसारणावर चर्चा होणार असून तृतीय गटात नविन कृषि अवजारे यंत्रे यांच्‍या शिफारशी प्रसारीत करण्‍यात येणार आहेत. विविध शेतपिकांतर्गत पिक सुधारणा तंत्रज्ञान सुधारात्‍मक व्‍युहरचना यावर शिफारशी चौथ्‍या गटात मांडण्‍यात येणार आहे तर नैसर्गीक साधन संपत्‍ती व्‍यवस्‍थापनावरील शिफारशी पाचव्‍या  गटात मांडण्‍यात  येणार आहेत. उद्यानविद्या पशु मत्‍स्‍य विज्ञान यावरील शिफारशी अनुक्रमे 6 7 गटामध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत. गट क्रमांक 8 मध्‍ये  मुलभूतशास्‍त्रे, अन्नशास्‍त्रे तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्‍यात येणार आहेत. पिक संरक्षण कृषि अभियांत्रीकी या विषयावरील शिफारशी गट क्रमांक अनुक्रमे 9 10 गटामध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत तर सामाजिक शास्‍त्रावरील शिफारशी गट क्रमांक 11 मध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत.

दि. 30 मे रोजी राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्‍यात आलेल्‍या कृषि औचारे चाचणी, निर्मिती व‍ प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्‍यात येणार आहे. सदरील बैठकीचा समारोप 1 जुन 2013 रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री विजयरावजी कोलते यांची उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीसाठी राज्‍याचे मा. राज्‍यपाल व विद्यापीठांचे कुलपती मा. डॉ. के. शंकरनारायणन् व केंद्रीय कृषि मंत्री मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी व अनेक मान्‍यवरांनी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.