Tuesday, July 25, 2017

विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासासाठी कृषी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर देणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ट्रॅक्‍टर कट मॉडेल प्रात्‍यक्षिकांचा शुभारंभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृ‍षी यंत्रे व शक्‍ती विभागातील ट्रॅक्टर कट मॉडेलच्या प्रात्यक्षिक शुभारंभ शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, विभागप्रमुख प्रा. स्मिता सोलंकी, डॉ. स्मिता खोडके, प्रा. भास्करराव भुईभार, प्रा. विवेकानंद भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ विलास पाटील कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासासाठी पदवी अभ्यासक्रमांत विविध विषयांचे अध्यापन करतांना प्रात्यक्षिकांवर भर देणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन केले. प्रा. स्मिता सोलंकी व प्रा. पंडित  मुंडे यांनी ट्रॅक्टर कट मॉडेल विषयी उपस्थितांना तांत्रिक माहिती दिली. सदरिल मॉडेल मुळे विद्यार्थ्‍यांना ट्रॅक्‍टरबाबत तंत्रशुध्‍द ज्ञान अवगत करणे सोपे होणार आहे. प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी प्रास्‍ताविकात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांत मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचा आढावा घेतला. कार्यक्रमास प्रा. सुमंत जाधव, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय सुपेकर, प्रा. श्याम गरुड, प्रा. संजय पवार, प्रा. लक्ष्मिकांत राऊतमारे आदीसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रा. पंडित  मुंडे यांनी मानले.

मराठवाडया करिता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषी सल्ला


Saturday, July 22, 2017

कृषी विद्यापीठाच्‍या प्रगतीसाठी पुर्ण कार्यक्षमतेसह परिणामकारक कार्य करावे लागेल... कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु


वनामकृविच्‍या नुतन संचालकांचा स्‍वागत समांरभ
आज कृषी विद्यापीठापुढे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात अनेक आव्‍हाने आहेत. कोणत्‍याही संस्‍थेच्‍या प्रगतीसाठी संस्‍थेत कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांच्‍या कार्यावर अवलंबुन असते. विद्यापीठाच्‍या प्रगतीसाठी सर्वांना पुर्ण कार्यक्षमतेसह परिणामकारक कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यापीठाचे नुतन संचालकांचा सत्‍कार व माजी संचालकांच्‍या निरोप समारंभ दिनांक 20 जुलै रोजी आयोजित करण्‍यात आला होता, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर नुतन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, माजी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदीची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यापीठास प्रगतीपथावर नेण्‍यासाठी सर्वांना हार्ड वर्क सोबतच स्‍मार्ट वर्क करावे लागेल. कार्यक्रमात नुतन संचालकांनी सर्वांच्‍या सहकार्यांनी कृषी शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचे विद्यापीठ कार्य उंचावण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला तर माजी संचालक डॉ अशोक ढवण व माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्‍या मनोगतात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांचे ऋणनिर्देश व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात नुतन संचालक व माजी संचालक यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ बी एम ठोंबरे यांनी केले तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, July 18, 2017

मौजे किन्‍होळा (ता. मानवत) येथे शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवाद

विविध पिकांच्‍या पेरणीसाठी कमी कालावधीच्‍या वाणाची निवड करण्‍याचे वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्‍स फाऊंडेशन यांचे संयुक्‍त विदयमाने मौजे किन्‍होळा ता. मानवत येथे शेतकरी-शास्‍त्रज्ञ कार्यक्रमातंर्गत दिनांक 17 जुलै रोजी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ तथा विस्‍तार कृ‍षी विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व रेशीम संशोधन योजनाचे प्र‍भारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी खरीप हंगामातील पीक परिस्थिती व किड-रोग व्‍यवस्‍थापन या विषयावर संवाद साधला. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना डॉ. आळसे यांनी खरिप हंगामातील आपत्‍कालीन पीक नियोजनाचे महत्‍व विषद करतांना सुर्यफुल, तुर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तुर (४:२), बाजरी + तुर (३:३), एरंडी, कारळ, आणि तीळ या पिकांची पेरणी ३१ जुलै पर्यंत करता येईल असे सांगितले. पेरणीस जसजसा उशिर होईल तसतसे उत्‍पन्‍नात घट येते म्‍हणून पेरणीस विलंब झाल्‍यास वरीलप्रमाणे पीक नियोजन करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. विविध पिकांच्‍या पेरणीसाठी कमी कालावधीचे वाणाची निवड करावी, यात सोयाबीन चे एमएयुएस-७१, जेएस-९३०५, तुर मध्‍ये बीडीएन-७११, संकरीत बाजरी मध्‍ये एएचबी-१६६६, तीळ- जेएलटी-७, त्‍याचबरोबर दोन ओळीतील अंतर कमी करुन हेक्‍टरी झाडांची संख्‍या वाढवावी जेणे करुन उत्‍पन्‍न वाढेल. १५ जुलै नंतर कापुस, भुईमुग, खरिप ज्‍वारी हि पीके न घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
डॉ. लटपटे यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सल्‍ला दिला. जेणेकरुन निसर्गाचा समातोल राहिल, शेंदरी बोंड अळी सारख्‍या किडींचा उद्रेक होणार नाही, निसर्ग श्रृंखला अबाधीत राहील, मित्र किडींची संख्‍या वाढल्‍यामुळे किड व्‍यवस्‍थापन सोपे होईल. किटकनाशकांचा अतिवापर टाळावा. दोन किटकनाशक एकमेकांत मिसळून फवारणी करु नये असे आवाहन केले. शेतीमध्‍ये शाश्‍वतता आणण्‍यासाठी एक एकर तरी तुतीची लागवड करावी म्‍हणजे महिन्‍याला शेतक-यांच्‍या हाती पैसा खेळता राहील. भविष्‍यात रेशीम उदयोगाला फारशी स्‍पर्धा राहणार नाही. त्‍यामुळे रेशीम कोषाचे बाजारभाव ५० ते ६० हजार रुपये प्रति क्विंटल राहतील. वर्षाकाठी एक एकर मधून अडीच ते तीन लाख हमखास उत्‍पन्‍न मिळेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. याप्रसंगी शेतकरी श्री. हनुमान कदम यांचे शेतातील हळद पिकांची शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष पाहणी करुन सुक्ष्‍मअन्‍न द्रव्‍यांचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. श्री. विलास सवाने यांनी आभार मानले.

वनामकृविचे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण संचालनालयात नुतन संचालक रूचु

कृषि विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ, कृषी परिषद, पुणे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषी) या पदावर डॉ विलास पाटील यांची निवड केली असुन संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर तर विस्‍तार शिक्षण संचालकपदी डॉ प्रदीप इंगोले यांनी निवड केली आहे. आज दिनांक 18 जुलै रोजी या नुतन संचालकांनी विद्यापीठात पदभार स्‍वीकारला. शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील हे सध्‍या प्रभारी कुलसचिव असुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत तसेच मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख म्‍हणुन ते कार्यरत होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे यापुर्वी प्रभारी संशोधन संचालक म्‍हणुन विद्यापीठात कार्यरत होते. नुतन विस्‍तार शिक्षण संचालक हे अकोला ये‍थील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रभारी विस्‍तार शिक्षण संचालक पदावर कार्यरत होते. सदरिल निवडीबाबत नुतन संचालकांचे विविध स्‍तरावरून अभिनंदन होत आहे. 
डॉ विलास पाटील, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता कृ‍षी 


डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन संचालक 
डॉ प्र‍दीप इंगोले, विस्‍तार शिक्षण संचालक 

Monday, July 17, 2017

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्याक्रमांतर्गत विविध गावात पशुलसीकरण कार्यक्रम

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिकन्‍या व कृषिदुतांनी केले साधारणत: साडेचारशे जनावराचे लसीकरण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे बाभळगांव, ब्राम्‍हणगांव व रायपुर येथे साधारणत: साडेचारशे जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले.
मौजे बाभळगांव येथे रेशीम संशोधन केंद्र व कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प येथे कार्यरत असलेले कृषिदुत व कृषिकन्‍या यांच्‍या वतीने दिनांक 12 जुलै रोजी पशुलसीकरण कार्यक्रम घेण्‍यात आला. यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ बी एम ठोंबरे, डॉ सी बी लटपटे, पशुधन विकास अधिकारी डॉ यु बी कुलकर्णी, प्रा बैनवाड, डॉ प्रमोद झाडे, प्रा सुनिता पवार, प्रगतशील शेतकरी श्री माऊली पारधे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साधारणत: 100 जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले व डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता लिंबोळे हिने केले. आभार प्रा सुनिता पवार यांनी मानले.
मौजे ब्राम्‍हणगांव येथील पशुलसीकरण कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ आर डी अहिरे, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ ए टी शिंदे, डॉ के डी नवगिरे, डॉ व्‍ही यु कावळे, डॉ व्‍ही एम घोळवे, ग्रामसेवक जनार्धन सोनवणे, संतोष काळदाते, भगवानरव घाडगे, कौशल्‍याबाई तुरे आदीसह गावांतील शेतकरी व कृषिदुत मोठया संख्‍येने उपस्थित होते. येथे साधारणत: दीडशे जनावराचे लसीकरण करण्‍यात आले.

मौजे रायपुर येथील कापुस संशोधन योजना येथे कार्यरत असलेल्‍या कृषीकन्‍याच्‍या वतीने पशुलसीकरण कार्यक्रम दिनांक 14 जुलै रोजी घेण्‍यात आला. यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच श्री दत्‍तराव मस्‍के, पशुधन विकास अधिकारी डॉ माने, डॉ बी एम ठोंबरे, प्रा. एस एस शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साधारणत: दोनशे जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. स‍दरिल पशुलसीकरण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या व कृषिदुतांनी परिश्रम घेतले.


Tuesday, July 11, 2017

मौजे मानोली (ता. मानवत जि. परभणी) येथील सौ. सुनंदाताई मदनमहाराज शिंदे यांना जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार जाहिर

वनामकृविचे माननीय कुलगुरूंच्‍या हस्‍ते शिंदे दाम्‍पत्‍यांचा सत्‍कार
शेती उत्‍पादन वाढ व प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा अंगिकार व प्रसार करण्‍यासाठी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली येथील सौ. सुनंदाताई मदनराव शिंदे यांना जग‍जीवनराम अभिनव किसान पुरस्‍कार 2016 नुकताच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या तर्फे जाहीर करण्‍यात आला असुन त्‍यानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते शिंदे दाम्‍पत्‍यांचा दिनांक 11 जुलै रोजी सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र लोंढ, डॉ अशोक जाधव, डॉ डिंगाबर पेरके, डॉ हिराकांत काळपांडे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
या वेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयातील अनेक शेतकरी तंत्रशुध्‍द शेती करून विविध पिकांचे चांगले उत्‍पादन घेतात, त्‍यांचे हे कार्य इतर शेतक-यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्‍यापासुन इतर शेतकरी प्रेरणा घेतील. यासाठी अशा प्रगतशील शेतक-यांना सन्‍मानित करणे गरजेचे आहे. शिंदे दाम्‍पत्‍याचा कापसातील मानोली पटर्न मराठवाडयात प्रसिध्‍द आहे, परंतु याचा प्रचार व प्रसार इतर राज्‍यातही झाला पाहिजे
संशोधक संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, सौ. सुनंदाताई शिंदे या जगजीवनराम अभिनव किसान पुरस्‍कार प्रा़प्‍त झालेल्‍या मराठवाडयातील पहिल्‍याच महिला शेतकरी असुन कृषि विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यात शिंदे दाम्‍पत्‍यांचे मोठे योगदान आहेप्रगतशील शेतकरी श्री मदनमहाराज शिंदे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या श्रमाला विद्यापीठ तंत्रज्ञानाची जोड दिल्‍यास निश्चितच शेतीत भवितव्‍य आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांसाठी उपयुक्‍त असुन सदरिल पुरस्‍कार हा कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या तांत्रिक पाठबळाचे फलित असल्याचे मत व्यक्त केले
सौ सुनंदाताई शिंदे यांना यापुर्वी राज्‍यपातळीवर ज्‍वारीचे विक्रमी उत्‍पादन काढल्‍याबद्दल महाराष्‍ट्राच्‍या माननीय राज्‍यपालांच्‍या हस्‍ते प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्‍यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र, हैद्राबाद येथील भारतीय भरडधान्‍य संशोधन संस्‍था व इक्रीसॅट यांच्‍या व्‍दारे निर्मित विविध खरीप व रब्‍बी ज्‍वारीच्‍या सुधारीत वाणांचे बीजोत्‍पादन आदर्श लागवड तंत्रज्ञानाने घेऊन ज्‍वारीच्‍या नवीन वाणांचा प्रचार व प्रसार करण्‍यासाठी शिंदे दाम्‍पत्‍य गेल्‍या वीस वर्षापेक्षा जास्‍त काळापासुन प्रयत्‍नशील आहे. बीटी कपाशी लागवड पध्‍दतीचा मानोली पॅटर्न परिसरात प्रसिध्‍द असुन गाई, म्‍हशी व शेळीपालन करून दुग्धव्‍यवसायचा जोडधंदासाठी परिसरात चारा उपलब्‍ध करणे, विद्यापीठाव्‍दारे मानोली व परिसरातील शेतक-यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, महिला बचत गट चालवणे, परिसरात विहिर पुर्नभरण कार्यक्रम राबविणे, शेततळे, गांडुळ खत, विविध सुधारीत शेती यंत्राचा वापर आदी बाबत शिंदे दाम्‍पत्‍य अग्रेसर आहेत. त्‍यांच्‍या या कार्याची पावती म्‍हणुन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सौ. सुनंदाताई शिंदे यांची या पुरस्‍कारासाठी शिफारस केली होती. सदरिल पुरस्‍कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या स्‍थापना दिनी 16 जुलै रोजी बंगलोर येथे प्रमुख मान्‍यवरांच्‍या उपस्थित वितरीत केला जाणार आहे. सदरिल पुरस्‍कारात रू 50,000 रोख रक्‍कम या व्‍यतिरीक्‍त सौ शिंदे यांना त्‍यांनी केलेल्‍या कार्याचे विस्‍तार कार्य इतरांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी रू. 50,000 प्रवास खर्च, प्रशस्‍तीपत्र व सन्‍मानचिन्‍ह याचा समावेश आहेकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. सुत्रसंचालक श्री ऋषिकेश औंधेकर यांनी केले तर आभार डॉ गजेंद्र लोंढे यांनी मानले